fbpx

Day 01 : Introduction : Career in Graphic Design

नमस्कार मित्रानो,

कोरल ड्रॉ शिकण्यासाठी ह्या कोर्सला प्रवेश घेतल्याबद्दल आपला आभारी  आहे. ३ भागाच्या सर्टिफिकेट कोर्समधील व्हेक्टर ग्राफिक्स हा पहिला भाग. त्यांच्यासाठी आहे, ज्यांना फक्त कोरल ड्रॉ शिकायचे आहे.  कोरल ड्रॉ शिकायला सुरुवात करण्यापूर्वी करिअरसंबंधित हा प्रस्तावना व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. म्हणजे ग्राफिक डिझाईन म्हणजे काय आणि या विषयाची व्याप्ती कळेल. खालील नोट्स वाचूनही ती  तुमच्या लक्षात येईल. 

ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी  खूप विषय आणि त्यासाठी बरीच सॉफ्टवेअर्स आहेत. व्हेक्टर ग्राफिक्स हा त्यापैकीच एक विषय. कोरल ड्रॉ हे व्हेक्टर ग्राफिक्ससाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख सॉफ्टवेअर्स पैकी एक आहे. हा कोर्स फक्त पाहायचा आणि ऐकायचा नाही तर पाहून आणि ऐकून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करण्याचा आहे. हा कोर्स केल्यावर ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते तर तुम्हाला समजेलच, शिवाय तुम्हीच म्हणाल ‘ग्राफिक डिझाईन शिकायला इतकं साधं आणि सोपं असेल असं कधी वाटलंच नव्हतं.

माझा जास्तीत जास्त भर हा मोठा विषय छोटा करून शिकविण्यावर अधिक असतो. कारण सारांश समजला कि विस्ताराने शिकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि नंतर त्यातील बारकावे शिकण्याची मजा काही औरच असते. शिकताना जे काही शिकतोय ते सारं सोपंच वाटलं पाहिजे या मताचा मी आहे. 

तात्पर्य कमीत कमी गोष्टी  शिकायच्या पण डिझाईन बनवताना काही कमी पडतंय किंवा काही माहित नाही असे होता कामा नये. मी हे डिझाईन सहज बनवू शकतो हा आत्मविश्वास वाटला पाहिजे. थोडक्यात तुम्ही किती शिकता, तुम्हाला किती माहिती आहे, या पेक्षा प्रॅक्टिकली तुम्ही किती चांगलं काम करता हे  मी अधिक महत्वाचे समजतो. ग्राफिक डिझाईनची ढीगभर पुस्तके वाचून जे शक्य होत नाही, ते थोड्या प्रॅक्टिकलने शक्य होते, हा गेल्या २५ वर्षातील अनुभव आहे. आणि म्हणूनच कमीत कमी वाचून, पाहून आणि ऐकून जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करायला लावणारा हा कोर्स आहे. कारण करिअर नुसतं वाचून, पाहून, ऐकून नाही तर प्रॅक्टिकल करून घडते, हे समजून घ्या.   

कोरल ड्रॉ ओपन करून आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलला सुरुवात करायची आहे. पण तत्पूर्वी ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. त्या नंतर शिकायचा  क्रम निश्चित करू आणि स्टेप बाय स्टेप आपण  शिकत जावू. 

 ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? 

ग्राफिक डिझाईन ही संदेशवहनाची एक कला आहे. मग तो संदेश एखादे वाक्य किंवा एखादा पॅरेग्राफ असेल, त्यासोबत एखादे चित्र, फोटो किंवा विविध रंगातील आकार असतील. तो संदेश कोऱ्या कागदावर हाताने लिहिलेला असेल, रंगविलेला असेल किंवा कॉम्प्युटरवर तयार केलेला असेल. वर्तमानपत्रातील जाहिरात, पोस्टर, वेबसाईट, इनबॉक्समध्ये येऊन पडणारे ईमेल्स किंवा अगदी जवळचे उदाहरण द्यायचे झाले तर मोबाईलवर आलेला मेसेज किंवा व्हिडीओ म्हणजे हे सारे ग्राफिक डिझाईनचेच नमुने आहेत. थोडक्यात मजकूर, चित्र, फोटो, विविध रंगी आकार, म्युझिक आणि व्हिडीओ पैकी एक, दोन किंवा अनेकांचे मिश्रण करून केलेली जी रचना / कलाकृती असते त्या कलाकृतीला ग्राफिक डिझाईन म्हणतात. ग्राफिक डिझाईन एवढ्यावर थांबत नाही तर आपले दैनंदिन जीवन त्याने व्यापून टाकलेले असते. तुमच्या अवती भोवती जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला ग्राफिक डिझाईनच पाहायला मिळेल. त्याच्यावर आपली सहजच दृष्टी पडते आणि कळत नकळत तुमच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ग्राफिक डिझाईनच्या सहवासात असता. तुम्ही कुठेही असा. ग्राफिक डिझाईन तुमचा पिच्छा सोडत नाही. सकाळी तुम्ही चहा पिता ती चहा पूड अगोदर ज्या बॉक्स किंवा पाऊच मध्ये असते तो बॉक्स किंवा पाऊच टाकून देण्याअगोदर नीट पहा. त्यावर प्रिंट झालेले डिझाईन हे ग्राफिक डिझाईन असते. असे विविध आकारातील असंख्य प्रॉडक्ट्स आणि त्यासाठी लागणारी विविध प्रकारची डिझाईन्स हे ग्राफिक डिझाईनचेच काम आहे. मार्केटमधील प्रॉडक्ट्सची संख्या पाहता ही प्रिंट पॅकेजिंग इंडस्ट्री किती मोठी असेल याची कल्पना करा. रोज नवे नवे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येत असतात, जुन्या प्रॉडक्ट्सची डिझाईन्स बदलायची असतात. त्यासाठी ग्राफिक डिझाईनर्सची आवश्यकता असते. 

चहा पीत पीत समोर वर्तमान पत्र असेल तर त्यामधील प्रत्येक बातमी, प्रत्येक जाहिरात म्हणजे ग्राफिक डिझाईन असते. नव्हे तर संपूर्ण वर्तमान पत्र हे ग्राफिक डिझाईनचे उत्तम उदाहरण आहे. जाहिरात क्षेत्र हे आणखी एक खूप मोठे क्षेत्र आहे, जिथे २४ तास कल्पक ग्राफिक डिझाईनर्सची गरज भासते.  या जाहिरात कलेचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. जसे ज्या असंख्य प्रॉडक्ट्सची पॅकेजिंग डिझाईन्स बनवावी लागतात तसे त्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीही कराव्या लागतात. त्या जाहिरातीची डिझाईन्स बनविणे हे पुन्हा ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. जाहिरातीचे अनेक प्रकार असतात म्हणजे जाहिरात डिझाईनच्या कामाची व्याप्ती किती मोठी असेल त्याची कल्पना करा. चहा, नाश्ता झाल्यावर पेपर बाजूला ठेऊन जेंव्हा तुम्ही बाहेर पडता तेंव्हा नकळत तुमची नजर रस्त्यावरील दुकानाचे बोर्ड्स, चौकातील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि बिल्डिंगवरील होर्डिंग्सवर पडतच असेल. ते सारे ग्राफिक डिझाईनचेच प्रकार आहेत. ऑफिसमध्ये गेलात तर टेबलवरील स्टेशनरीमध्ये व्हिजिटिंग कार्ड्स, प्रॉडक्ट कॅटलॉग तसेच कॉम्प्युटर सुरु केल्यावर आलेले ईमेल्स, काहीतरी शोधण्यासाठी पाहत असलेल्या वेबसाईट्स, त्या वेबसाईटवरील बाजूला लक्ष वेधून घेणारी हलती बोलती बॅनर्स असे जे अनेक प्रकार तुम्ही रोजच पाहता, ते सारे ग्राफिक डिझाईन असते. घरी आल्यावर विरंगुळा म्हणून एखादी टीव्ही सिरीयल पाहत असाल तर ब्रेकमधील जाहिराती यासुद्धा ग्राफिक डिझाईनमध्येच येतात. टीव्ही ऍड्स बनविणे हे ग्राफिक डिझाईनरचेच काम आहे. रात्री जेवून झोपण्यापूर्वी जेंव्हा सहजच युट्युबवरील ज्ञानात भर घालणारे जे व्हिडीओज आपण पाहता ते ग्राफिक डिझाईनच असते. एवढेच कशाला युट्युब चॅनल बनवायचं कामही ग्राफिक डिझाईनरलाच करावं लागतं. 

सुट्टीच्या दिवशी एखाद्या मॉलमध्ये गेलात तर तिथे ग्राफिक डिझाईन्सचे असंख्य नमुने तुम्हाला पाहायला मिळतील. असंख्य प्रॉडक्टस, लटकवलेली डॅंगलर्स, चिटकविलेली पोस्टर्स, म्हणजे  सारे ग्राफिक डिझाईनच असते. प्रासंगिक निमंत्रण कार्ड्स, लग्न पत्रिका, आयकार्ड, साईन बोर्ड, आदी अनेक प्रकारची डिझाईन्स ग्राफिक डिझाईनरलाच करावी लागतात. 

फोटोग्राफी हा ग्राफिक डिझाईनचा एक प्रमुख भाग असला तरी ते स्वतंत्र करिअर क्षेत्रही आहे. फंक्शन फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, टेबल टॉप, इंडस्ट्रिअल फोटोग्राफी असे अनेक प्रकार यामध्ये येतात. फोटो एडिटिंग मिक्सिंग करून लग्नाचे अल्बम डिझाईन करणे हा खूप मोठा व्यवसाय आहे. हल्ली तर प्रिवेंडिंग फोटोग्रा[फीचे फॅड आल्याने फोटोग्राफीच्या कामात आणखीनच भर पडली आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ टाकण्याची तर चढाओढच लागली आहे. त्यासाठी स्पेशल काहीतरी बनविण्यासाठी ग्राफिक डिझाईनरच लागतो. व्यावसायिक स्पर्धेच्या जगात जो तो आजकाल ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करतो. यासाठी सोशल नेटवर्क साईटवर बिझनेस प्रमोट करण्यासाठी अगोदर डिझाईन्स बनवावी लागतात. पुन्हा त्यासाठी ग्राफिक डिझाईनरच लागतो.  ग्राफिक डिझाईन मधील  कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. सर्वच्या सर्व मला एका वेळी सांगणे शक्य नाही. एवढ्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल कि  ग्राफिक डिझाईन इतकी करिअर संधी इतर कोणत्याही क्षेत्रात नाही. 

ग्राफिक डिझाईन ही जाहिरात कला आहे. समोरच्याला मोहात पाडून त्याचे मत आणि मन-परिवर्तन करण्याची कला आहे. एखादा प्रॉडक्ट विकत घेताना तुम्ही शंभर वेळा विचार करता. एखादा प्रॉडक्ट कधी कधी तुम्ही पटकन विकत घेता. असे का होते. मला जे म्हणायचे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याला पटले पाहिजे, आणि त्याच्याकडून मला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. इथे व्यापारी, उद्योजक त्याच्या उत्पादनाबद्दल त्याच्या ग्राहकाला काहीतरी पटवून देत असतो. प्रॉडक्ट कितीही चांगला असला तरी जाहिरात आणि मार्केटिंग केल्याशिवाय तो खपत नाही. जाहिरात आणि मार्केटिंग हे ग्राफिक डिझाईन शिवाय होऊच शकत नाही. म्हणून ग्राफिक डिझाईन खूप महत्वाचे आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे दुसऱ्याला पटवायची कला आहे, असे म्हटले तरी चालेल. कसे पटवायचे ? कोणत्या मार्गाने पटवायचे ? कसे पटवायचे? कशासाठी पटवायचे ? हा सारा विचार आणि अभ्यास ग्राफिक डिझाईन करण्यापूर्वी करावा लागतो. माझा प्रॉडक्ट चांगला कसा आहे, हे व्यापारी ग्राहकाला पटवून सांगतो. त्याला तो प्रॉडक्ट विकत घ्यावयास प्रवृत्त करतो. हे सारे तो व्यापारी जाहिरातीच्या ज्या माध्यमातून सांगतो ते म्हणजे ग्राफिक डिझाईन असते. एखादा प्रॉडक्ट आणि तो प्रॉडक्ट विकत घेणारा ग्राहक यांच्यामध्ये ज्या माध्यमातून संवाद होतो ते ग्राफिक डिझाईन असते. म्हणूनच ग्राफिक डिझाईनला कम्युनिकेशन आर्ट असेही म्हणतात. व्यापाराशी संबंध असल्याने ग्राफिक डिझाईनला कमर्शिअल आर्ट असेही म्हणतात. जाहिरातीसाठी मनातील एखादी कल्पना दृश्य रूपात आणली जाते म्हणून हिला व्हिज्युअल आर्ट असेही म्हणतात. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार, उत्पादक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर या सर्वाना ग्राफिक डिझाईनची गरज असते. अशी डिझाईन्स हे लोक ज्याच्याकडून करून घेतात तो ग्राफिक डिझाईनर. त्याला कमर्शिअल आर्टिस्ट असेही म्हणतात. 

ग्राफिक डिझाईनची व्याप्ती पाहिल्यानंतर ग्राफिक डिझाईन म्हणजे खूप वेगळं आणि अवघड आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर मनातुन ते काढून टाका. आपल्या अवती भवती ग्राफिक डिझाईन असते हे वर मी सुरुवातीलाच सांगितले आहे, त्यावरून ग्राफिक डिझाईनबद्दल थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच असेल. तसे पहिले तर ग्राफिक डिझाईन आपण दैनंदिन जीवनात नेहमीच जगत असतो. मुळात प्रत्येकजण ग्राफिक डिझाईनरच  असतो. कसा ते पाहा. 

अगदी स्वतःपासून सुरुवात करायची झाली तर, नटायला आणि नीटनेटके राहायला तुम्हा सर्वांनाच आवडते. आणि त्यासाठी जे काही करायला पाहिजे, ते तुम्ही करताच ना. कोणत्या पॅन्टवर कोणता शर्ट कि टीशर्ट घालायचा, बूट कि चप्पल, हेअर स्टाईल कशी पाहिजे? मुलींच्या बाबतीतही ड्रेस कोणता, चप्पल, नेलपेंटपासून ते बिंदीपर्यंत मॅचिंग कलर्सचा जो त्या विचार करतात ते ग्राफिक डिझाईन असते. कारण कलर्स हा ग्राफिक डिझाईनचा एक महत्वाचा टॉपिक आहे. लहान मुलांना विविध रंगीत खेळण्यांशी खेळायला आवडते. त्याच्या हातात पेन्सिल किंवा खडू द्या. ते दिसेल तिथे रेघोट्या मारते. म्हणजे आपण त्याला स्केचिंग म्हणणार आहोत. म्हणजे रंगांची आवड आणि रेघोट्या मारणे  ही जन्मजात वृत्ती असते. इथे  ग्राफिक डिझाईनमध्ये वेगळं काहीच नसते. स्केचिंग आणि कलर्सचा खूप अभ्यास ग्राफिक डिझाईनमध्ये असतो.  तात्पर्य हे कि रंगांशी खेळणं आणि रेघोट्या मारणं हे ग्राफिक डिझाईन शिकताना नवीन नसतं. पण तरीही जाणीवपूर्वक ह्या गोष्टी ग्राफिक डिझाईन शिकताना आपणास शिकाव्या लागतात.  

या साऱ्या गोष्टी तुम्ही करता म्हणजे ग्राफिक डिझाईनची दृष्टी तुमच्याकडे आहे. हे नक्की. असं नीटनेटकं राहण्याची सवय असायला हवी. कोणत्याही कामातला नीटनेटकेपणा म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. व्यावहारिक कोणत्याही कृतीपाठीमागे जसा हेतू लपलेला असतो,  त्याचप्रमाणे ग्राफिक डिझाईन हे एखादा हेतू ठेऊनच केले जाते. हेतू साध्य होतो कि नाही हे नंतर कळतं. उत्तम डिझाईन करूनसुद्धा प्रॉडक्टची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाही. तर कधी दोन ओळीची साधी जाहिरात खूप फायदा करून देते. ग्राफिक डिझाईनसाठी सृजनशीलतेची गरज असते. सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे निर्माण करणारी कल्पना.  ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरला संधी आहे, पॅकेज चांगलं मिळतं म्हणून शिकायचं नाही. कलेची आवड असणं महत्वाचं. एखादी गोष्ट आवडली तरच पुढे जाण्यात अर्थ आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये खूप गमती जमती असतात. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचं चॅलेंज असतं. एकदा का तुमच्या मनात ग्राफिक डिझाईनची आवड निर्माण झाली कि पुढचा सारा प्रवास सोपाच आहे. ग्राफिक डिझाईनचे विश्व खूप मोठे आहे. किती शिकलात तरी पुढे शिकण्यासाठी खूप काही आहे.  ग्राफिक डिझाईमध्ये रोज कितीही नवी टेक्नॉलॉजी आली तरी ग्राफिक डिझाईनचा बेस समजला असेल तर टेक्नॉलॉजी शिकणं अजिबात अवघड नाही. ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर तुम्ही जेवढे कराल तेवढे कमीच आहे. 

चित्रकला :

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी चित्रकला चांगली पाहिजे, हे खरं असले तरी ग्राफिक डिझाईनवर चित्रकलेचा  प्रभाव २०-२५ वर्षांपूर्वी खूप होता. कारण त्यावेळी संपूर्ण डिझाईन, आर्टवर्क, फोटो फिनिशिंग हे हाताने करायला लागायचे. प्रत्यक्ष रंग घेऊन ब्रशने चित्र रंगवायचे होते. ते स्किल हातामध्ये असणे त्यावेळी महत्वाचे होते. आज चित्रकलेचे महत्व कमी झालंय असे मुळीच नाही, फायनल डिझाईन, आर्टवर्क, फोटोफिनिशिंग आता कॉम्प्युटरवर होत असले तरी ते बनवताना चित्रकलेमुळे निर्माण झालेल्या कल्पक दृष्टीचा खूप उपयोग होतो. ग्राफिक डिझाईनचे बेसिक स्केच करण्यासाठी चित्रकलेचा उपयोग होतो. आणि हे बेसिक स्केच करणाऱ्यालाच खूप महत्व असते. तुमची चित्रकला बेताची किंवा उत्तम कशीही असुदे, पण आज कॉम्प्युटरच्या युगातही ग्राफिक डिझाईनचे पहिले टूल स्केच पॅड आणि पेन्सिल हेच आहे. आणि ते पुढे कधीही बदलणार नाही. याला कारण जेवढ्या सहजपणे विचार करीत करीत आपण पेन्सिलने कागदावर रेखाटन करतो, ती नैसर्गिक सहजता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कधीच येत नाही. विचार करीत करीत कागदावर अशा  रेघोट्या मारतच  डिझाईनसाठी एखादी भन्नाट कल्पना सुचते. बाकी नंतर सारे कॉम्प्युटरवरच करायचे असते. डिझाईनची कल्पना सुचणे म्हणजे ८० टक्के डिझाईन पूर्ण झाल्यासारखे असते. अर्थात विचार कसा करायचा, कल्पना कशी सुचते आणि स्केचिंग हा ग्राफिक डिझाईनचा बेसिक पण अत्यंत महत्वाचा अभ्यास आहे. हा व  यासाठी इतर काही संलग्न विषयांचा अभ्यास करावा लागतो. ज्याचा कलेची दृष्टी निर्माण होण्याकरिता खूपच उपयोग होतो. ज्याच्याकडे अशी कलेची दृष्टी आणि कल्पकता आहेत तो चांगला ग्राफिक डिझाईनर नक्कीच बनतो.    

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय, आणि ग्राफिक डिझाईन शिकल्यावर तुम्हाला कोणकोणती डिझाईन्स बनवायची आहेत, याची कल्पना तुम्हाला आली असेल तर आपण आता थोडे पुढे जावून ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी सुरुवात कशी करायची ते पाहू. 

कोर्स मटेरियल :

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी तुमच्याजवळ नेहमी असायला हवं एक स्केचपॅड आणि पेन्सिल. दररोज तुम्ही जे काही अनुभवता किंवा जे काही शिकता ते लिहिण्यासाठी एक नोटबुक, कॅमेरा (मोबाईल मधील वापरला तरी चालेल.), कोरल ड्रॉ, फोटोशॉप इन्स्टॉल केलेला आणि  इंटरनेट कनेक्शन असलेला लॅपटॉप किंवा पीसी. एवढं कोर्स मटेरियल जवळ ठेवा आणि पुढे शिकायला सुरुवात करा. 

शिकण्याचा क्रम : 

ग्राफिक डिझाईन शिकण्याचा क्रम आणि प्रत्यक्षात डिझाईन बनविण्याचा क्रम परस्पर विरोधी आहेत. ते कसं पाहा. प्रत्यक्षात जेंव्हा तुम्हाला ग्राफिक डिझाईन बनवायचं असतं तेंव्हा प्रथम विचार करावा लागतो, त्यानंतर एखादी कल्पना सुचावी  लागते, आणि त्यानुसार डिझाइनमध्ये वापरण्यासाठी रॉ मटेरियल गोळा करायचे असते. जसे फोटो मिळवणे, मजकूर लिहिणे, त्यानंतर कच्चे स्केच बनवायचं म्हणजे साधारण गोळा केलेल्या रॉ मटेरिअलची मांडणी / रचना कशी असावी हे ठरवायचं. त्यानंतर विषयानुरूप रंगसंगतीचा विचार करायचा आणि सर्वात शेवटी  कॉम्प्युटर सुरु करून डिझाईनला सुरुवात करायची. म्हणजे बघा विषयानुरूप ग्राफिक डिझाईनची संकल्पना फायनल झाली कि शेवटी कॉम्प्युटरवर डिझाईन सुरु करायचं असतं. ग्राफिक डिझाईनसाठी एखादी कल्पना कधीकधी पटकन सुचते तर कधीकधी ती सुचायला काही तास, दिवस किंवा काही महिनेही लागतात. ग्राफिक डिझाईनची हे जे कल्पना सुचणं आहे ते खरं ग्राफिक डिझाईन आहे. तिथून पुढे कॉम्प्युटरवर जे करायचं असतं, सुचलेली एखादी कल्पना दृष्य रूपात आणायची असते त्यासाठी कोरल ड्रॉ आणि फोटोशॉपमध्ये कमीतकमी पण अत्यंत महत्वाचे जे काही शिकायला पाहिजे तेच मी शिकवणार आहे. आणि खात्री बाळगा ते खूप सोपं आहे. पण शिकताना सुरुवातीला आपण कॉम्पुटरवर डिझाईन बनविण्यासाठी जे जे काही शिकायला पाहिजे ते ते शिकायचं आहे. 

व्हेक्टर आणि रास्टर : 

सर्वात प्रथम हे समजून घ्या कि ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त दोनच प्रकारचे ग्राफिक ऑब्जेक्ट असतात एक व्हेक्टर ग्राफिक ऑब्जेक्ट आणि दुसरा रास्टर ग्राफिक ऑब्जेक्ट. ह्या दोन ग्राफिक ऑब्जेक्टससाठी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरतात, मुख्यत्वे इलस्ट्रेटर किंवा कोरल ड्रॉ हे सॉफ्टवेअर व्हेक्टर ग्राफिक ड्रॉईंगसाठी आणि फोटोशॉप हे सॉफ्टवेअर रास्टर ग्राफिकसाठी वापरतात. व्हेक्टर आणि रास्टर ऑब्जेक्टस  मिळून ग्राफिक डिझाईन बनत असल्यामुळे एकाच डिझाईनसाठी किमान ही दोन सॉफ्टवेअर्स वापरावीच लागतात. ग्राफिक  डिझाईन शिकत असताना व्हेक्टर ग्राफिक्ससाठी आपण कोरल ड्रॉ आणि रास्टर ग्राफिक्ससाठी फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरणार आहोत. 

ग्राफिक डिझाईन मधील ऑब्जेक्टस :

ग्राफिक डिझाईनमध्ये जरी अनेक कमांड्स, विविध इफेक्टस, इलस्ट्रेशन्स, फोटोज, फॉन्ट्स आणि असंख्य ऑब्जेक्टस वापरलेले असले तरी त्यांची बेसिक विभागणी केली तर ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त पाच प्रकारचेच ऑब्जेक्ट असतात. ते म्हणजे रेषा, आकार, रंग, टेक्स्ट आणि फोटो. म्हणजे रेषा आणि आकार ड्रॉ करायला शिकणे, आकारामध्ये रंग भरणे, टेक्स्ट टाईप करणे आणि फोटो काढायला शिकले कि झाले. हे खूप सोपं आहे पण ग्राफिक डिझाईनमध्ये कल्पना लढवून कोणते आकार, कोणता फोटो वापरायचा आणि काय टाईप करायचे हे निश्चित झाल्यावर निश्चित केलेल्या ऑब्जेक्टसची आकर्षक मांडणी करायला शिकणं म्हणजे खरं ग्राफिक शिकणं असतं हे अगोदर लक्षात ठेवा. 

सॉफ्टवेअर्स ; 

ग्राफिक डिझाईनमधील लाईन, शेप, कलर, टेक्स्ट आणि फोटो या पाच ऑब्जेक्टस पैकी लाईन, शेप, कलर आणि टेक्स्ट या चार व्हेक्टर ऑब्जेक्टचा अभ्यास आपण कोरल ड्रॉ ह्या व्हेक्टर ग्राफिक सॉफ्टवेअर मध्ये  आणि फक्त फोटो / इमेज या एकमेव रास्टर ऑब्जेक्टचा अभ्यास आपण फोटोशॉप या रास्टर ग्राफिक सॉफ्टवेअरमध्ये करणार आहोत. तेंव्हा प्रथम ओपन करूया कोरल ड्रॉ आणि शिकायला सुरु करूया व्हेक्टर ग्राफिक ड्रॉईंग.

आज मी इथेच थांबतो, आपण उद्या भेटू. तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार. 

धन्यवाद.

Scroll to Top